संगमेश्वर : पुर्ये तर्फे देवळे येथील मुख्य रस्त्यावरील जुना कॉजवे खचला

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये तर्फे देवळे मुख्य रस्त्या वरील बौद्धवाडी लगत असणारा जुना कॉजवे हा गेल्या आठवड्यात होत असलेल्या पावसामुळे पूर्णपणे खचला आहे. सदर कॉजवे वरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे.

पुर्ये गावापासून हायस्कूल, कॉलेज, महाविद्यालय दूर असल्यामुळे विद्यार्थ्यांना बाईकचा आधार घ्यावा लागतो कॉजवेचा बराच भाग खचल्यामुळे विद्यार्थ्यांना जाणे येणे धोकादायक बनले आहे. या रस्त्यावरून पुर्ये बौद्धवाडी, ओझरवाडी, घडशी वाडी, धनगरवाडी, गवळीवाडी व पूर्ण कोचरी गाव वाहतूक करत असतो त्यामुळे या मार्गावरून वस्तीत वाड्यातील लोकांना वाहतूक करणे, धोकादायक झाले आहे.

सदर कॉजवे वरून ये जा करताना पाहणी करूनच ग्रामस्थांनी वाहतूक करावी असे पुर्ये तर्फे देवळे ग्रामपंचायत मार्फत सांगण्यात आले आहे. या वेळी पुर्ये रस्त्यावरील धोकादायक कॉजवे ची पाहणी पुर्ये उपसरपंच बापू लोटनकर, ग्रा सदस्य मधुकर पवार, तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी विशाल कांबळे, पोलीस पाटील कांबळे, तलाठी चौगुले यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 PM 18/Jun/2025