सांगली : कर्नाटकातील अलमट्टी धरण व्यवस्थापनाने जून महिन्यात ४७ टक्के पाणीसाठा ठेवला पाहिजे; पण, सध्या अलमट्टी धरणात ५२ टक्के पाणीसाठा झाल्यामुळे केंद्रीय जल आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.
यामुळे अलमट्टी धरण व्यवस्थापनावर केंद्रीय जल आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीतर्फे केंद्रीय जल आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.
कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील म्हणाले, कर्नाटकातील अलमट्टी धरणाची १२३ टीएमसी म्हणजे ५१९.६ मीटरपर्यंत पाणीसाठवण क्षमता आहे. या धरणामध्ये कुठल्या महिन्यात किती पाणीसाठा केला पाहिजे, याबद्दल केंद्रीय जल आयोगाने नियम ठरविले आहेत. त्यानुसार जूनअखेरपर्यंत ५७ टीएमसी म्हणजेच ५१३.६० मीटर पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे. असे असतानाही अलमट्टी धरण व्यवस्थापनाने दि. १७ जून रोजी धरणात ६४.९७ टीएमसी पाणीसाठा ठेवला असून, धरण ५३ टक्के भरले आहे.
सध्याच्या पाणीसाठ्याची आकडेवारी केंद्रीय जलआयोगाच्या नियमाला धरून नाही. अलमट्टी धरणाच्या या पाणीसाठ्याचा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना फटका बसू शकतो, म्हणून अलमट्टी धरणातील पाणीसाठी केंद्रीय जल आयोगाच्या नियमांनुसारच ठेवला पाहिजे. यासाठी अलमट्टी धरण व्यवस्थापनाला सूचना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:41 18-06-2025














