खेडजवळ भीषण अपघात : पिकअप चालकाने दुचाकीस्वाराला धडक देऊन पळ काढला!

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर, खेड तालुक्यातील लोटे माळ येथील आराधना हॉटेलसमोर ७ जून २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. गोवा दिशेने जाणाऱ्या लेनवर एका पिकअप चालकाने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली आणि मदतीसाठी न थांबता घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात दुचाकीस्वार नितीन शरद म्हादलेकर (वय २७) गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअप गाडी क्रमांक एम.एच. १२ एस.एफ. ३६६३ चा चालक भाऊ बबन मरगळे (वय ३७) हा मुंबईहून गोव्याकडे जात होता. रात्रीच्या वेळी, आवश्यक असतानाही, त्याने इंडिकेटर न देता अचानकपणे आपल्या डाव्या बाजूच्या दुसऱ्या लेनवर गाडी घेतली. याचवेळी त्याच्या डाव्या बाजूने लोटे दिशेने जाणारे दुचाकीस्वार नितीन शरद म्हादलेकर (दुचाकी क्रमांक एम.एच. ०८ ए.टी. ४४८५) हे त्यांच्या दुचाकीसह पिकअप गाडीच्या मागील लोखंडी बंपर आणि साईड पॅनेलवर आदळले.

या धडकेत नितीन म्हादलेकर यांना गंभीर आणि किरकोळ दुखापती झाल्या असून, त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अपघातानंतर पिकअप चालक भाऊ बबन मरगळे हा घटनास्थळी थांबला नाही किंवा जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत उपलब्ध न करता तेथून पळून गेला.

या घटनेची तक्रार खेड पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस फौजदार उदय संभाजी मोरे यांनी दिली आहे. याप्रकरणी खेड मोटर अपघात नोंदणी क्रमांक १०/२०२५ अन्वये तपास सुरू होता. अखेर, १८ जून २०२५ रोजी पहाटे ०२:१६ वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक १९३/२०२५ अंतर्गत भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) सह मोटार वाहन कायदा कलम १३४ (अ) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भाऊ बबन मरगळे अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 19-06-2025