चिपळूण भागात पडझड..

चिपळूण : गेले तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात घरे, गोठ्यांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागामार्फत करण्यात आले आहेत.

सोमवारी रात्री तळसर गावातील अजय जयराम मोहिते यांचा घराच्या बाहेरील भिंत पडली. यामध्ये मोहिते यांचे नुकसान झाले असून, त्याचा पंचनामा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्याच रात्री मार्गताम्हाणे येथे रवींद्र देवजी तांबिटकर यांचा गोठा पावसामुळे कोसळला. या नुकसानीचाही पंचनामा

करण्याची कार्यवाही सुरू आहे. मंगळवारी पहाटे झालेल्या पावसात तालुक्यातील गणेशखिंड-भोम-कापरे-मालदोली या रस्त्यावर झाड पडल्याने या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू होती. संबंधित यंत्रणेने जेसीबीच्या सहाय्याने ते झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. वादळी वाऱ्यामुळे पडणाऱ्या पावसात ठिकठिकाणी झाडे, झाडांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान, तालुक्यातील ग्रामीण भागात पावसामुळे होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून, ग्रामपंचायतींमार्फतही योग्य ती उपाययोजना केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 19-06-2025