चिपळूण-कऱ्हाड वाहतूक सुरळीत!

चिपळूण : मुसळधार पावसामुळे चिपळूण-कऱ्हाड मार्गावरील पाटण तालुक्यातील वाजे येथे पर्यायी रस्ता वाहून गेला होता. परिणामी, दोन दिवस या मार्गावरील अवजड वाहतूक ठप्प होती. अखेर पाटण वाजे येथील जोडरस्त्याचे काम मार्गी लागल्याने या मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

दोन दिवसांपासून चिपळूण कऱ्हाड या महत्त्वाच्या मागावरील वाहतूक ठप्प होती. दुचाकी, हलक्या चारचाकी वाहनांचा मोरगिरीमार्गे प्रवास सुरू होता; मात्र अवजड आणि एसटी वाहतूक बंद झाल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते; मात्र या मार्गाचे महत्त्व ओळखून प्रशासनाने तातडीने पावले उचलली. संबंधित ठेकेदार कंपनीकडून युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे करून घेण्यात आली. या प्रयत्नांमुळे अखेर बुधवारी दुपारपासून या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. विशेष म्हणजे, अवजड वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी प्रशासनाचे आभार मानत समाधान व्यक्त केले. या मार्गाची दुरुस्ती लवकर करण्यात आल्यामुळे आसपासच्या गावांतील दळणवळण तसेच कृषी, औद्योगिक आणि आरोग्यविषयक वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला आहे. चिपळुणातून पुणे, क-हाड, सातारा, कोल्हापूर, सांगली, पंढरपूर आदी मार्गावरील एसटी वाहतूकदेखील सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 19-06-2025