रत्नागिरीतून १७ वर्षीय मुलाचे अपहरण, बाणकोटला गेल्याची माहिती!

रत्नागिरी : शहरातील राजीवडा परिसरातून मंगळवारी (१७ जून २०२५) दुपारी १.४५ च्या सुमारास एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा मुलगा कोणालाही काहीही न सांगता अचानक घरातून निघून गेला. कुटुंबीयांनी त्याचा शोध शहरातील विविध भागांत, रेल्वे आणि बस स्थानकांवर तसेच नातेवाईक व मित्रांकडे घेतला, मात्र तो कुठेही सापडला नाही. दरम्यान, या अल्पवयीन मुलाने एका ओळखीच्या महिलेला स्वतःच्या मोबाईलवरून फोन करून ‘बाणकोट येथे जात आहे’ असे सांगितल्याचे समोर आले आहे. मात्र, तो अद्याप त्या महिलेकडेही पोहोचलेला नाही.

या घटनेमुळे मुलाच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार, अल्पवयीन मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३६३ अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, मुलाचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 19-06-2025