रत्नागिरी : रत्नागिरी शहरालगतच्या कारवाची वाडी येथील पोदार प्रेप स्कूलमध्ये ‘इंटरनॅशनल मड डे’ आणि ‘इंटरनॅशनल योग डे’ च्या निमित्ताने ‘योग इन मड’ हा एक आगळावेगळा उपक्रम पालकांसमवेत साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच नैसर्गिक जीवनाशी जोडणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते.
शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी आणि पालकांना चिखलात खेळण्याचा एक आनंददायक अनुभव मिळाला. नैसर्गिक स्पर्श, सृजनशीलता आणि निसर्गप्रेम यांचा संगम असलेल्या या उपक्रमाने मुलांच्या भावनिक व शारीरिक विकासाला चालना दिली. चिखलाशी खेळताना मुले आणि पालकांनी ‘योग इन मड’ या संकल्पनेचा अनुभव घेतला, ज्यामुळे शरीर आणि मनाचे संतुलन साधण्यास मदत झाली.
या उपक्रमात ‘योग मुद्रा विथ मडी हँड्स’, ‘मडी फिट योगा’, ‘मड बेकरी’, ‘मड पेंटिंग’, ‘मडी बडीस योगा’ आणि ‘फुटबॉल’ अशा विविध रंजक आणि मातीशी जोडणाऱ्या सर्जनशील खेळांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांसाठी एक आकर्षक फोटोबूथ देखील सजवण्यात आले होते. शिक्षकांनी घेतलेल्या प्रात्यक्षिकातून माती केवळ चिखल नसून, त्यात खेळल्याने आरोग्य सुधारते, मानसिक ताण कमी होतो आणि नैसर्गिक आनंद मिळतो, हे मुलांना आणि पालकांना पटवून दिले.
“प्रत्येक विद्यार्थ्याचे शालेय शिक्षणाबरोबरच नैसर्गिक जीवनाशी नाते जोडणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” असे ‘अर्ली चाइल्डहुड असोसिएशन’च्या अध्यक्षा आणि पोदार प्रेपच्या संस्थापक व संचालिका डॉ. स्वाती पोपट वत्स यांनी सांगितले. या उपक्रमाची संकल्पना त्यांचीच होती. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्राचार्य सौ. प्राजक्ती गायकवाड, पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका सौ. अस्मिता चोप्रा, ऍडमिन ऑफिसर श्री. राहुल पाटील आणि सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 19-06-2025














