रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील धामणी पवारवाडीमधील जवळपास ४० घरांचा संपर्क तुटत आहे. असावी नदीवर (धामणी पेट्रोल पंप) बांधलेला पूल दरवर्षी पाण्याखाली जातो व त्यामुळे दलित वस्ती असलेल्या पवारवाडीला मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत असून, पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बांधलेला पूल वाहतुकीसाठी व जाण्या-येण्यासाठी धोकादायक आहे. पावसाळ्यामध्ये या वाडीमध्ये राहणाऱ्या लोकांना जीव मुठीत घेऊन आपली दैनंदिन कामे करण्यासाठी येणे-जाणे करावे लागत आहे. शालेय विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे. नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात झाडे व वेली वाढल्यामुळे नदीच्या प्रवाहामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. पूल दरवर्षी पाण्याखाली जातो. महामार्गापर्यंत नदीचे पाणी येत असल्याने ग्रामपंचायत, श्रद्धा हॉटेल यांचा पहिला मजला पाण्याखाली गेला होता.
दरवर्षी होणारी अडचण यावर योग्य तो शासनाने व प्रशासनाने उपाय म्हणून पुलाची उंची वाढवून परिसरातील ग्रामस्थांची कायमची अडचण दूर करावी, अशी मागणी अशी धामणी पवारवाडीचे अध्यक्ष सुरेश पवार, ज्येष्ठ सल्लागार आर. बी. पवार, रमेश पवार, सागर पवार, शरद पवार, सचिव दीपक पवार, योगेश पवार, सीताराम पवार, संतोष पवार, सदाशिव पवार, नीलेश पवार आदींनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 19/Jun/2025














