रत्नागिरीत ‘सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा’ दाखल: हजारो भाविकांनी घेतले पवित्र शिवलिंगाचे दर्शन!

◼️ आजदेखील दर्शनाची संधी; जास्तीत जास्त भाविकांनी या पवित्र दर्शनाचा लाभ घ्यावा

रत्नागिरी : महाराष्ट्रात ‘दि आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे आयोजित ‘सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा’ काल रत्नागिरीत दाखल झाली. सायंकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत अंबर हॉल टीआरपी येथे रुद्र पूजा आणि दर्शन सोहळा पार पडला, ज्यात मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावत पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले.

रत्नागिरीतील जनतेला मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या पवित्र दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अ‍ॅड. सौ. जया उदय सामंत यांच्यासह धर्मसिंह चौहान, विनिता गोखले, निलेश मिरजकर, भुवना महागावकर, राजेश भुर्के, प्रमोद खेडेकर, प्रवीण लाड हे या सोहळ्याचे मुख्य आयोजक आहेत.

सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा ऐतिहासिक वारसा

११ व्या शतकात मोहम्मद गजनीने सोमनाथ मंदिरावर आक्रमण केले, तेव्हा पवित्र शिवलिंगाचे तुकडे झाले होते. त्यावेळी अग्निहोत्रींनी यापैकी काही अवशेष जपून ठेवले आणि त्यांना शिवलिंगाचा आकार देऊन त्यांची पूजा केली. हे अवशेष गुप्त ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आले होते.

१९२४ साली कांचीचे परमचार्य यांनी एक भाकीत केले होते की, १०० वर्षांनी बंगळूरुमधील संत येतील आणि त्यांना हे अवशेष सुपूर्द केले जातील. या भाकितानुसार, हे पवित्र शिवलिंग गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या बंगळूरु आश्रमात सुपूर्द करण्यात आले. आता याच मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे अवशेष ‘दि आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे आयोजित या यात्रेद्वारे जनतेसमोर आणले जात आहेत. हे अवशेष भारताच्या समृद्ध संस्कृतीचा आणि आध्यात्मिक वारशाचा अमूल्य भाग आहेत.

गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या इच्छेनुसार आणि सर्व समाजाला या पवित्र अवशेषांचे दर्शन घडावे या उद्देशाने त्यांचे अनुयायी भारतातील विविध भागांमध्ये हे ज्योतिर्लिंग घेऊन जात आहेत. तळकोकणातून सुरू झालेली ही यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात, विशेषतः रत्नागिरी शहरात येत आहे, हे रत्नागिरीकरांचे भाग्यच म्हणावे लागेल.

आजही दर्शनाची संधी!

आज, १९ जून २०२५ रोजी सायंकाळी ६.०० ते ८.३० वाजेपर्यंत मराठा मंडळ हॉल, जिल्हा परिषद जवळ, माळनाका, रत्नागिरी येथेही या पवित्र शिवलिंगाच्या दर्शनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. जास्तीत जास्त भाविकांनी या पवित्र दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 19-06-2025