पुरात अडकलेल्यांची संगमेश्वर पोलिसांकडून सुटका

संगमेश्वर : जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. विशेषतः संगमेश्वर खाडीपट्ट्यात सोमवारी पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले होते, ज्यामुळे अनेक नागरिक अडकून पडले होते. संगमेश्वर पोलिसांनी देवदुतासारखी धाव घेऊन लोकांचे प्राण वाचवले. त्यांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

मुसळधार पाऊस आणि पुराच्या लोंढ्यात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले धामणी येथील सनराईज हॉटेलजवळील पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न केले.

या बचावकार्यात पोलिस निरीक्षक शंकर नागरगोजे, अंमलदार सचिन कामेरकर, विनय मनबल, सतीश कोलगे, गिरिजाप्पा लोखंडे आणि उत्तम साळवे यांनी आपल्या जीवाची बाजी लावली.

मनुष्यहानी होऊ नये, यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि पुराच्या पाण्यातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. केवळ बचावकार्यच नव्हे, तर ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती त्या ठिकाणी लोकांना जनजागृती करण्याचे कामही पोलिसांनी केले. लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासंदर्भात मार्गदर्शन करून संभाव्य धोका टाळण्यास मदत केली. संगमेश्वर पोलिसांच्या या समयसूचकता आणि धाडसी कामगिरीमुळे मोठी दुर्घटना टळली असून, त्यांनी आपल्या खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडवले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 19/Jun/2025