चिपळूण आगाराकडून विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात मोफत पासचे वाटप

चिपळूण : एसटीने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन मासिक पास देण्यास चिपळूण आगाराकडून सुरुवात झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा भर पावसात उभे राहून पास काढण्याचा त्रास वाचला आहे.

याबाबत चिपळूण आगारप्रमुख दीपक चव्हाण म्हणाले, ‘विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवास पास तसेच एसटी महामंडळाकडून मासिक प्रवास पासासाठी ६६.६६ टक्के सवलत दिली जाते. ज्यामुळे त्यांना केवळ ३३.३३ टक्के शुल्क भरावे लागते. तसेच, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत, बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना एसटी प्रवास पास पूर्णपणे मोफत देण्यात येत आहे. आम्ही १६ जूनपासून ही योजना तालुक्यात सुरू केली आहे.

आतापर्यंत ३१ शाळांना आणि पाच महाविद्यालयांना या योजनेअंतर्गत पास दिले आहेत. शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची नावे असलेली यादी एसटी विभागाला दिल्यानंतर एसटीचे कर्मचारी थेट शाळांमध्ये जाऊन पात्र विद्यार्थ्यांना पास देत आहेत. त्यामुळे पास मिळवण्यासाठी एसटीच्या कार्यालयात रांगेत उभे राहण्याची गरज आता भासणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च याची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. यापूर्वी विद्यार्थी किंवा त्यांचे पालक एसटी आगार कार्यालयांमध्ये जाऊन रांगेत उभे राहून पास मिळवत होते. अनेकदा शाळांमधून संपूर्ण गटाने एकत्रित जाऊन प्रक्रिया पूर्ण केली जायची. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वेळ वाया जात असे आणि पालकांचेही श्रम खर्ची पडत असत. आता ही धावपळ पूर्णत थांबली आहे.

या मोहिमेंतर्गत पास वितरण सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना विद्यार्थ्यांची अद्ययावत यादी तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे १६ जूनपासून सुरू झालेली पास वितरण प्रक्रिया जूनअखेर अडथळाविना पार पडेल- दीपक चव्हाण, चिपळूण आगारप्रमुख.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 19/Jun/2025