चिपळूण : नवीन शैक्षणिक वर्षामध्ये पहिलीचा अभ्यासक्रम बदलला असून, आता शिक्षणाची अध्यापन पद्धती शिक्षककेंद्रित न राहता विद्यार्थीकेंद्रित बनली आहे. ही नवीन शिक्षणपद्धती व नवीन अभ्यासक्रमानुसार पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या ३७३ शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम तालुक्यात पूर्ण झाले आहे. त्यामुळे पहिलीच्या विद्यार्थ्यांना आता नव्या पद्धतीने कौशल्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे.
मुलांमध्ये असलेली शेती, पर्यटन, खेळ, पर्यावरण, तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या आवडीचा अभ्यास करून यामध्ये मुलांना उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी चिपळूण तालुक्यातील ३७३ शिक्षकांना बदललेल्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तालुक्यात २४५ जिल्हा परिषद शाळा असून, त्यातील ६८ शाळा खासगी आहेत तसेच पाच शाळा स्वयंसेवी संस्था चालतात. सीबीएसई पॅटर्न लागू नसलेल्या काही शाळा चिपळूणमध्ये सुरू आहेत.
पुस्तकी शिक्षणापेक्षा उपक्रमावर भर
पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षक प्रशिक्षणाकरिता सात विषयांची निवड केली होती. त्यामध्ये राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत टप्पा, मूल्यमापन व एचपीसी पार्श्वभूमी व नमुना, भाषा शिक्षण, गणित शिक्षण, कलाशिक्षण, यांचा समावेश होता.
नवीन शिक्षण धोरणानुसार, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकवण्यावर भर दिला जाणार आहे. आनंददायी व कौशल्यावर आधारित शिक्षण असल्याने विद्यार्थ्यांना याचा निश्चितच फायदा होईल. तालुक्यात याबाबत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे- श्रुती सावर्डेकर, शिक्षण विभाग, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 19/Jun/2025














