Pandharpur Wari: पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?

मुंबई – दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने टोलमाफी केली आहे. १८ जून ते १० जुलै या कालावधीत ही टोलमाफी दिली जाणार आहे. सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

पंढरपूरच्या जाणाऱ्या १० पालखीमार्गावर ही टोलमाफी असेल.

वारकऱ्यांच्या सोयी सुविधा आणि वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती या विषयांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २८ मे रोजी बैठक पार पडली होती. त्या बैठकीत वारीला जाणाऱ्या वाहनांसाठी टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांना आषाढी एकादशी २०२५ गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टीकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस संबंधित आरटीओ यांच्याशी समन्वय साधून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या, आरटीओ ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पंढरपूरला जातेवेळी आणि परत येताना दिनांक १८ जून २०२५ ते १० जुलै २०२५ या कालावधीत सवलत पालख्या, भाविक, वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांसाठी असेल अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सदरचे पास परतीच्या प्रवासासाठी ग्राह्य धरण्यात येतील याप्रमाणे स्टीकर्स तयार करण्यात यावेत असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृह विभागामार्फत सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अवगत करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्यभरातून पंढरपूरला जाणारे रस्ते

मुंबईमधील सायन-पनवेल महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, पुणे-सोलापूर, पुणे-सातारा-कोल्हापूर ते राज्य सीमेपर्यंतचा महामार्ग, त्याशिवाय मुंबई-पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-पुणे सोलापूर राष्ट्रीय मार्गाला जोडणारे नवीन राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग

वारकऱ्यांनी स्टिकर्स कुठून घ्यावेत?

राज्यभरातून पंढरपूरला जाणारे भाविक, वारकरी तसेत पालख्यांच्या वाहनांना संबंधित जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व पोलीस ठाणे, वाहतूक विभाग, शाखा, चौकी येथून भाविकांच्या मागणीप्रमाणे टोल फ्री पास घ्यावेत. हा पास किंवा स्टिकर्स घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा वाहतूक पोलीस चौकीत जावे लागेल. तिथे अर्ज भरून दिल्यानंतर हा पास तुम्हाला मिळेल. या टोलमाफीची मुदत केवळ १८ जून ते १० जुलै या कालावधीपर्यंत मर्यादित असेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 19-06-2025