रत्नागिरी : जिल्ह्याला यावर्षी विविध विभागांना वृक्षलागवडीचे मोठे उद्दिष्ट शासनाने दिले आहे. त्यापैकी रत्नागिरी सामाजिक वनीकरण विभागाला १ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या वृक्षलागवडीचे ‘जिओ टॅगिंग’ करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक रोपांची नोंद राहणार असून, तीन वर्षे या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी आमच्यावर राहणार आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी रणजित गायकवाड यांनी दिली.
वनक्षेत्र वाढवण्यासाठी ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत यावर्षी १० कोटी झाडे लावण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सर्व विभागांनी जागा तसेच दर्जेदार रोपे निश्चित करावीत. वृक्षारोपण मोहिमेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदांनी सहभाग घ्यावा. तसेच सामाजिक संस्थांनाही यामध्ये सामिल करून त्यांना आवश्यक आणि दर्जेदार रोपे मिळावीत, यासाठी सामाजिक वनिकरण विभागाच्या नर्सरींमध्ये ६ लाख विविध वृक्षरोपं तयार आहेत.
येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत वृक्षलागवडीकडे लक्ष देण्यात येणार आहे. मात्र त्यावेळी केल्या जाणाऱ्या वृक्षलागवडीचे ‘जिओ टॅगिंग” केले जाणार आहे. यावेळेस सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षलागवड प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या कडेला, सार्वजनिक जागेवर करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी त्या त्या विभागांना पत्र दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 PM 19/Jun/2025














