रत्नागिरी रेल्वेस्थानकातील गळती थांबेना

रत्नागिरी : येथील कोकण रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीच्या छताला २० दिवसांपासून लागलेली गळती अद्याप थांबत नसल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. गळती थांबत नसल्याने कोट्यवधी रुपये खर्चुन केलेल्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

कोकण रेल्वेमार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानकांचे नूतनीकरण व सुशोभीकरणाची कामे करण्यात आली. उद्घाटन झाल्यानंतर जोरदार पडलेल्या पावसात छताचा आतील भाग कोसळला. त्यानंतर या रेल्वेस्थानकाचे छत उडाल्याचा प्रकार घडला. त्यावेळी काम अर्धवट असल्याचा पवित्रा प्रशासनाकडून घेण्यात आला होता. यानंतर रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण पूर्ण झाल्याचे सांगून उद्घाटन करण्यात आले; मात्र मुसळधार पावसाने बाहेरून छान दिसणाऱ्या कामाची पोलखोल केली.

रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ गळती लागली आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेची प्रतीक्षा करताना कोठे थांबायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. लागलेल्या गळतीबद्दल प्रवासीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन तत्काळ आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांच्यातून होत आहे.

प्रवाशांनी थांबावे कुठे ?
गेल्या आठवड्यात पावसाने उसंत घेतल्यानंतर गळती रोखण्याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती; मात्र २० दिवस उलटूनही या ठिकाणी गळती होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रकाराचा फटका चाकरमान्यांना बसत आहे.

पहाटे रत्नागिरी रेल्वेस्थानकाकडून दिवा पॅसेंजर सुटत असल्याने या गाडीसाठी मुंबईला जाणारे प्रवासी वस्तीसाठी येतात; मात्र गळतीमुळे प्रवाशांनी थांबावे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 19/Jun/2025