चिपळूण : पुण्यामधील इंद्रायणी पूल पडल्यानंतर राज्यातील अनेक पुलांबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ढाकमोळी सुतारवाडी-धनगरवाडीला जोडणाऱ्या पुलाची दुरवस्था झाली असून, ऐन पावसाळ्यात हा पूल प्रशासनाने वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. या पुलाचे काम नव्याने झाले पाहिजे, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते. तरी नादुरुस्त पुलांचा प्रश्न जि. प. बांधकाम विभागाने मार्गी लावला पाहिजे, अशी मागणी माजी सरपंच दादा लाड यांनी केली आहे.
ढाकमोळी सुतारवाडी धनगरवाडीला जोडणाऱ्या कॉजवेचा पत्रा तुटून पडल्याने व लोखंडी अँगल गंजल्याने ऐन पावसाळ्यात येथील वाड्यांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे कॉजवेची दुरुस्ती करावी व भविष्यात येथे पूल बांधून हा प्रश्न तातडीने निकाली लावावा, अशी मागणी जि. प. चे माजी बांधकाम सभापती बाळकृष्ण जाधव यांनी केली होती. याच दरम्यान माजी सरपंच दादा लाड यांनी जि. प. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन वस्तूस्थिती निदर्शनास आणली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व आपण ग्रामपंचायतीशी संपर्क साधा असे सांगून हात झटकले.
ढाकमोळी सुतारवाडी व धनगरवाडी दुर्गम भागात असून येथे जाण्यासाठी जिल्हा परिषदेचा लोखंडी कॉजवे आहे. खूप वर्षांपूर्वी बांधलेला हा लोखंडी कॉजवे आता मोडकळीस आला आहे. याचा एक पत्रा सध्या पडल्याने सुतारवाडी, धनगरवाडी, तुरंबव वाडदेवाडी येथील लोकांना पावसाळ्यात या कॉजवेवरून वाहतूक करणे अवघड झाले आहे. तरी या लोखंडी कॉजवेची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी सरपंच दादा लाड यांनी ग्रामपंच्यायतीकडेही केली होती.
पुण्याच्या कोंडावळे पूल दुर्घटने नंतर आता अधिकारी आणि ग्रामपंचायतीची झोप उडाली असून तातडीने पुलावरील दळणवळण बंद करण्याचा फलक लावण्यात आला आहे. मात्र, यामुळे येथील ग्रामस्थांची दळणवळणाची गैरसोय होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 19/Jun/2025














