मंडणगड : कोकणातील शाहीर कलगीतुरा सन्मानाने भारावले

मंडणगड : कलगीतुरा सांस्कृतिक शाहिरी कलामंडळ रायगड रत्नागिरी (रजि) मंडळाच्या वतीने तमाशा व गौरी गणेश जाखडी नाच ही लोककला जतन करून तिचे रंगामंचावर सादरीकरण करणाऱ्या रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील ५३ कलामंडळांचा सन्मान सोहळा भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात झाला. ढोलताशांच्या गजरात झालेल्या सन्मानाने शाहीर भारावून गेले.

कलगीतुरा मंडळाच्या वतीने कलाकारांना प्रोत्साहन व ही कोकणची पांरपरिक लोककला अधिक वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने वर्षभरात कार्यक्रम सादर करणाऱ्या मंडळांना सन्मानित करण्यात येते. २०२४-२५ या वर्षामध्ये रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील १६ तमाशा मंडळांनी चैत्र महिन्यातील देवदेवतांच्या जत्रोत्सावात डबलबारी तमाशा सादर करून रसिकांचे मनोरंजन केले. जाखडी नृत्य स्पर्धा व डबलबारी कलगीतुरा कार्यक्रमांमधून २५ तरुण नाचमंडळांनी व १२ चाळीस वर्षावरील वयोगट असणाऱ्या नाचमंडळांनी आपली कला सादर केली.

या सर्व कलामंडळांना सन्मापत्र, सन्मानचिन्ह व सर्व कलाकारांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष राम टेंबे, शिवसेना युवासेना राज्य कार्यकारिणी कोअर कमिटी मेंबर विकास गोगावले, माजी जि. प. सदस्य जितू सावंत, सुहेब पाचकर, कलगीतुरा समन्वय समिती अध्यक्ष सुरेश महाबळे, रमेश घडवले, रामचंद्र म्हात्रे, किसन बाटे, प्रकाश कळंबे, शंकर तुरडे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:08 PM 19/Jun/2025