दापोली : दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांची गरज ओळखून १५ वर्षांच्या संशोधनातून खास ओल्या काजूगरासाठी ‘वेंगुर्ला-१० एमबी’ हे वाण लागवडीसाठी उपलब्ध करून दिले आहे. विद्यापीठाच्या काजू संशोधनातील हे सर्वात ‘युनिक’ वाण असून वेंगुर्ले फळ संशोधन केंद्रात रोपे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. मागणीनुसार शेतकऱ्यांना रोपे उपलब्ध करून दिली जातील, असे कोकण कृषी विद्यापीठाने सांगितले आहे.
या काजूच्या टरफलामध्ये तेल कमी, टरफलाची जाडी मध्यम व काजूगर काढण्यास सुलभ आहे, असे या वाणाचे खास वैशिष्ट्य आहे. अन्य जार्तीच्या काजूच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात चिक असतो व त्या बीची साल जाड असल्यामुळे वियांमधून काजूगर काढणे फार अवघड होते. बऱ्याचदा गर काढताना जाड सालीमुळे अखंड गर न मिळता गराचा तुकडा होतो. तसेच बियांमध्ये असलेल्या अधिक चिकामुळे हाताला इजा होते, हात खराब होतात. त्यामुळे ‘वेंगुर्ला-१० एमबी’ हे विकसित केलेले नवीन वाण भविष्यात शेतकऱ्यांच्या पसंतीस मोठ्याप्रमाणात उतरेल असे दिसत आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे हे वाण विकसित केले आहे.
काजूच्या हंगामात ओल्या काजू गराला मोठ्याप्रमाणात मागणी असते. मोठमोठ्या शहरांतील हॉटेल्समध्ये भाजी, मटण, चिकनमध्ये ओल्या काजूगरांचा वापर केला जातो. ओले काजूगर सुक्या भाजीसाठी आणि पुलाब व बिर्याणीमध्येही वापरले जातात. वेगवेगळ्या भाज्यांत ओले काजूगर वापरल्याने जेवणाची लज्जत फारच वाढते. त्यामुळे या ओल्या काजूगराला बाजारात खूप मागणी आहे. ओले काजूगर हंगामामध्ये १ हजार ते बाराशे रुपये किलो दराने विकले जातात. या ओल्या काजू गरातून कोकणात रोजची लाखो रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे विद्यापीठाने विकसित केलेली नवीन जात शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात उत्पन्न देईल, असे सांगितले जात आहे.
राज्यात १ लाख ९१ हजार हेक्टरवर काजू लागवड
१९५७ साली काजू पिकाचे संशोधन झाले, तर विद्यापीठाने देशातील पहिली जात निवड पद्धतीने विकसित केली. कोकण कृषी विद्यापीठाने सुमारे तीनशेहून अधिक काजूची वाणे गोळा केली आहेत. त्यातून वेंगुर्ला १ ते ९ या नवीन जाती विकसित केल्या, तर २०२४ साली वेंगुर्ला- १० एमबी ही नवीन जात विकसित केली, १९९० साली काजूचे ४० हजार हेक्टर क्षेत्र होते. त्याला रोजगार हमी योजना आणि विकसित केलेल्या काजूच्या जातींची जोड दिल्याने हे क्षेत्र राज्यात १ लाख ९१ हजार हेक्टर झाले आहे.
दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रादेशिक केंद्र वेंगुर्ले येथे या वाणाची रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मागणी केल्यानंतर रोपे उपलब्ध करून दिली जातील तर या नवीन वाणाविषयी अधिक माहिती विद्यापीठाच्या माहिती संशोधन केंद्रात उपलब्ध आहे-डॉ. आर. सी. गजभिये, सहयोगी अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:22 PM 19/Jun/2025














