‘ते’ बिबट्याचे पिल्लू गेले १० दिवस लांजा वनविभागाच्या ताब्यात

लांजा : बिबट्याचे पिल्लू आई शिवाय आढळून आल्यास ते उचलून नेण्याची आवश्यकता नसते. उलट त्या पिल्लाच्या आईशी त्याच जागेवर पुनर्भेट घडवून आणणे अपेक्षित आहे.आई आणि पिल्लाशी भेट झाली की नाही हे निश्चितपणे कळण्यासाठी पुनर्भेभेटीच्या ठिकाणी रात्रभर चालणाऱ्या कॅमेरा ट्रॅप ची व्यवस्था करावी ,असे वनखात्याचेच म्हणणे असताना पुनस येथे ८ जुन रोजी सापडलेल्या बिबट्याचे पिल्लू अद्यापही १० दिवस वन विभागाने आपल्याच ताब्यात ठेवले असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .

सध्या हे पिल्लू सुस्थितीत असले तरी या पिल्लाची आईशी भेट कधी होणार,? किंवा होणार आहे की नाही? आणि हे पिल्लू वनखाते आपल्या ताब्यात किती दिवस ठेवणार? असे अनेक प्रश्न आता या निमित्ताने पुढे आले आहेत

रविवार दिनांक ८ जून रोजी पुनस- रत्नागिरी मार्गावर पुनस येथे बिबट्याचे १५ ते २० दिवसांचे पिल्लू आढळून आले होते. त्यानंतर वन खात्याने हे पिल्लू ताब्यात घेतले असून गेल्या दहा दिवसांपासून हे पिल्लू वनविभागाच्या लांजा ताब्यात आहे. या पिल्लाला कापसाच्या बोळ्याने, दुधाच्या बाटलीने दूध भरवले जात आहे. सध्या पिल्लू सुस्थितीत आहे असे वनविभागाचे म्हणणे आहे. मात्र अशा प्रकारे बिबट्याचे सापडलेले पिल्लू हे वनविभागाला आपल्या ताब्यात ठेवता येते का? किंवा अशा प्रकारे किती दिवस ठेवता येते ?असे अनेक प्रश्न आता वन्य प्राणी मित्राकडून उपस्थित केले जात आहेत .

वास्तविक पाहता बिबट्याचे पिल्लू त्याच्या आई शिवाय आढळून आल्यास सामान्यता त्याचा बचाव करण्याच्या हेतूने त्याला तेथून उचलण्याची आवश्यकता नसते. कारण आई शिकारीसाठी जाताना त्याला तात्पुरते एकटे सोडून गेलेली असू शकते. तसेच जंगलात आई शिवाय सोडलेली पिल्ले तग धरून जगण्याची शक्यता फारच कमी असते.आणि म्हणूनच अशी पिल्ले जर आढळून आली तर त्यांना व्यत्यय

होऊ न देता त्यांची आई परतण्याकडे लक्ष ठेवावे. खरे तर पिल्लांची मुक्तता करणे अभिप्रेत नसून त्यांची त्यांच्या आईशी पुनर्भेट घडवून आणणे अपेक्षित आहे. ज्या जागेवर पिल्ले व आईची पुनर्भेट झाली की नाही हे निश्चितपणे कळण्यासाठी पुनर्भेटीच्या ठिकाणी रात्रभर चालणाऱ्या कॅमेरा ट्रॅप ची व्यवस्था करावी असे खुद्द वनखात्याचेच म्हणणे आहे. तर पुनस येथे सापडलेल्या बिबटाच्या पिल्लाला वनखात्याने दहा दिवस आपल्याकडे कसे काय ठेवले? हा देखील प्रश्नच आहे.

ज्या ठिकाणी हे पिल्लू सापडले त्या ठिकाणी हे पिल्लू ठेवून आई येते का हे पाहण्याचा आपण तीन ते चार वेळा प्रयत्न केला पण पिल्लाची आई आलीच नाही असे लांजा वनविभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे या पिल्लाबाबत आता वनविभागाचे अधिकारी नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता वन्य प्राणीजीव मित्रांचे लक्ष लागले आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:07 19-06-2025