रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उबाठाकडून निष्ठावंताऐवजी बाहेरुन आलेल्याला उमेदवारी दिल्यास पक्षातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राजीनामे तयार करण्यात आले असून, उमेदवारीच्या घोषणेनंतर त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये अनेक पदाधिकारी व शिवसैनिकांनी ठाकरेंना पाठिंबा दिला. मागील अडीच वर्ष याठिकाणी पालकमंत्री व आमदार म्हणून कार्यरत असणारे उदय सामंत यांच्यासमोर ठाम उभे राहून अनेक ग्रामपंचायतींवर भगवा फडकवण्यात महत्वाची भूमिका बजावली.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ उबाठाला सुटणार असल्याने, याठिकाणी उबाठाकडून जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. इच्छुकांच्या मुलाखतीही झाल्या असून, उबाठाकडून सध्या उदय बने आणि राजू महाडिक यांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली आहे.
ऐन निवडणुकीच्या आधीच अन्य पक्षातून काही पदाधिकारी येणार असून, त्यांना तिकीट दिले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवरुनही स्थानिक पदाधिकाऱ्यांना
विचारणा करण्यात आली होती. मात्र याला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. वरिष्ठांपर्यंतहि निष्ठावंतांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. निष्ठावंतांना उमेदवारी दिल्यास जिवाचे प्राण लावून निवडून आणण्यासाठी प्रयत्न कर असे विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपजिल्हाप्रमुखांन सांगितले आहे.
दरम्यान, अन्य पक्षातून येऊन त्याला उमेदवारी दिली गेल्यास मात्र उपजिल्हाप्रमुख, विभागप्रमुख शाखाप्रमुखांनी राजीनामे देऊन तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजीनाम्याचे निर्णय अंमलात आणले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 15/Oct/2024









