“देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल” : अमित शाह 

Amit Shah: व्यवहारात इंग्रजी भाषेचं वर्चस्व वाढत असून, याचं संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठं विधान केले. जे लोक इंग्रजीमध्ये बोलतात, त्यांना इंग्रजी बोलण्याची लाज वाटू लागेल, असे शाह म्हणाले.

राष्ट्राची ओळख भारतीय भाषा असल्याचेही ते म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह माजी सनदी अधिकारी आयएएस आशुतोष अग्निहोत्री यांच्या पुस्तक कार्यक्रमाला उपस्थित होते. ‘मै बूंद स्वंय, खुद सागर हूं’ या पुस्तकाचे प्रकाशन अमित शाह यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले, ‘देशाचा आत्मा भाषा असतात. भारतातील भाषांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा आणि मातृभाषेबद्दल अभिमान बाळगून जगाचे नेतृत्व करण्याची वेळ आली आहे.’

भाषा आपल्या संस्कृतीची रत्ने

‘देशात जे इंग्रजीमध्ये बोलतात, त्यांना इंग्रजी बोलण्याची लवकरच लाज वाटायला लागेल, असा समाज निर्माण करणे आता फार दूर राहिलेले नाही. ज्यांचा संकल्प दृढ आहे, तेच बदल घडवून आणू शकतात. माझे मत असे आहे की, आपल्या देशातील भाषा आपल्या संस्कृतीची रत्ने आहेत. आपापल्या भाषांशिवाय आपण खरे भारतीय म्हणून राहू शकत नाही’, अशी भूमिका अमित शाहांनी यावेळी मांडली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:05 19-06-2025