रत्नागिरी : शामराव पेजे महामंडळामार्फत थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

रत्नागिरी : जिल्ह्यातील छोटे व्यावसायिक आणि स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांकरिता शामराव पेजे महामंडळामार्फत आखलेल्या थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. इतर मागास प्रवर्गातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या योजनांचा लाभ घ्यावा. शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात या कर्ज योजनेबाबतचे अर्ज उपलब्ध आहेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबाव येथे भेट देऊन अथवा कार्यालयाच्या (०२३५२) २२८४७० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक प्रीती पटेल यांनी केले आहे.

इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (वीरशैव लिंगायत समाजाकरिता), संत सेनानी महाराज केश शिल्पी महामंडळ नाभिक समाजाकरिता, संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ (उर्वरित ओबीसी समाजाकरिता) व शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ (उर्वरित ओबीसी समाजाकरीता) या महामंडळांच्या थेट कर्ज योजना सुरू असून उमेदवारांनी अर्ज सादर करावेत. या योजनेची कर्ज मर्यादा रक्कम एक लाख रुपयांपर्यंत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी नियमित 48 महिने (4 वर्षे) इतका असून 2 हजार 85 रुपये या मासिक हप्त्यांमध्ये परतफेड करायची आहे. नियमित हप्त्यांची परतफेड करण्याऱ्या लाभार्थींना शून्य टक्के व्याज दर लागू राहील. लाभार्थींनी कर्जाची परतफेड नियमित दरमहा न केल्यास थकीत हप्त्यावरील रकमेवर द.सा.द.शे. 4 टक्के प्रमाणे व्याज आकारण्यात येईल.

या योजनेमधून मत्स्य व्यवसाय, कृषि क्लिनिक, सायबर कॅफे, संगणक प्रशिक्षण, झेरॉक्स सेंटर, ब्यूटी पार्लर, मसाला उद्योग, पापड उद्योग, वडापाव विक्री केंद्र, भाजी विक्री केंद्र, चहा विक्री केंद्र, हॉटेल, गॅरेज, इलेक्ट्रिकल शॉप, मोबाइल रिपेरिंग व्यवसाय, किराणा दुकान, कृषी संलग्न व्यवसाय इत्यादी किंवा कायदेशीररीत्या सुरू करता येऊ शकणाऱ्या कोणत्याही व्यवसायाकरिता अर्जदार अर्ज सादर करू शकतो

कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार इतर मागासप्रवर्गातील असावा. अर्जदाराकडे तहसीलदारांकडून प्राप्त झालेला ओबीसी प्रवर्गाचा दाखला असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षांदरम्यान असावे. अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसल्याचे प्रमाणपत्र तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला. महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला (वय अधिवास प्रमाणपत्र) अर्जदाराच आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड वयाचा पुरावा, व्यवसायाबाबत आवश्यक असलेली कागदपत्रे तसेच महामंडळाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे जिल्हा कार्यालयाकडे कर्ज अजांसोबत सादर करावी. या योजनेच्या कर्जाचे अर्ज जिल्हा कार्यालयाकडे उपलब्ध आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:50 19-06-2025