रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील देवी वाघजाई कलामंचाचा मध्य प्रदेशात सन्मान करण्यात आला.
मध्य प्रदेश सांस्कृतिक विभागामार्फत मध्य प्रदेश जनजातीय संग्राहालयाच्या बाराव्या स्थापना दिनानिमित्त ६ जून ते १० जून या कालावधित महुआ महोत्सव पार पडला.
या महोत्सवात भारतातील विविध राज्यांना आपली लोककला सादर करण्यासाठी मध्याप्रदेश सांस्कृतिक विभागामार्फत पाचारण करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्रथमच तेर्ये (ता. संगमेश्वर) येथील श्री देवी वाघजाई कलामंचाला मिळाली. या कलामंचाचे प्रमुख राजेंद्र दत्ताराम बाईत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महुआ महोत्सवात कोळी नृत्य सादर करत रसिक प्रेक्षकांची दाद मिळवली. कोळी बांधवांची जीवनगाथा उलगडणाऱ्या या नृत्याने आयोजकही भारावले. मध्य प्रदेश सरकारने या सहभागी कलाकारांचा सन्मान केला.
कलेचा वारसा लाभलेले राजेंद्र बाईत यांचे वडील दत्ताराम बाईतदेखील पहाडी आवाजाचे, लोककला शाहीर, कवी होते. त्यांच्याच तालमीत तयार झालेले देवी वाघजाई सांस्कृतिक कलामंचाचे प्रमुख राजेंद्र बाईत संगीत क्षेत्रातील जाणकार, उत्कृष्ट वादक आहेत. त्यांनी अनेक गाणी संगीतबद्ध केली आहेत. महाराष्ट्राची लोककला जतन आणि संवर्धनाचे कार्य ते नमन या लोककलेच्या माध्यमातून कित्येक वर्षे करत आहेत.श्री वाघजाई सांस्कृतिक कलामंच नावारूपाला येण्यासाठी सतीश पवार, उमेश बाईत, अजित मोहिते, उदय भुरवणे, सुभाष पवार या मंचाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:01 19-06-2025














