संगमेश्वर : पांगरीत सापडला मृत बिबट्या

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील पांगरी येथे मृत बिबट्या सापडला आहे. या बिबट्याच्या मानेवर जखमा असल्यामुळे दोन बिबट्यांच्या झटापटीमध्ये त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने बांधला आहे; परंतु अद्याप पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्याचे शवविच्छेदन न झाल्यामुळे नेमके कारण समजू शकलेले नाही.

पांगरी येथील गुरुनाथ दुडये यांच्या घरापासून काही अंतरावर काल सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळला. याची माहिती त्यांनी पोलिसपाटील आणि सरपंचांना दिली. सरपंच सुनील म्हादे यांनी वनविभागाला खबर दिली. वनविभागाचे रत्नागिरी परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांना दिली. सहकाऱ्यांसह सकाळी नऊ वाजता मृत बिबट्याची पाहणी केली. हा बिबट्या नर असून, दोन वर्षांचा आहे. त्याच्या मानेवर जखमा असून दोन, चार दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास ठरलेला असतो. आपल्या हद्दीमध्ये तो दुसऱ्या बिबट्याला घुसखोरी करून देत नाही.

त्यासाठी लढायची तयारी असते. पांगरी येथील मृत बिबट्याच्या अंगावर जखमा आहेत. त्यामुळे दोन बिबट्यांची झटापट झाली असावी. यामध्ये हल्ल्यात हा बिबट्या मृत झाला असावा, असा अंदाज आहे; मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत अजून याचे शवविच्छेदन झालेले नाही. त्यामुळे मृत्यू कशामुळे झाला, हे निश्चित सांगता येत नाही, अशी माहिती रत्नागिरी परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 20/Jun/2025