रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासाला आजपासून (ता. २०) सुरुवात होणार आहे.
यामध्ये संस्थेने गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठेव दरांच्या योजना आणल्या आहेत. पतसंस्थेला गुरुवारी भाजप प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी पतसंस्थेच्या स्वरूप सहकार अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी संस्थाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांचा पुष्पगुच्छ, श्री गणेशाची प्रतिमा देऊन सत्कार केला.
या प्रसंगी आमदार चव्हाण म्हणाले की, स्वामी स्वरूपानंद पतसंस्था दीर्घकाळ सातत्याने वर्धिष्णू व्यवहार करत आली आहे. विश्वासार्ह स्थान असलेली ही विशाल संस्था नावीन्यपूर्ण उपक्रम व विविध योजना राबवत असते. जनसंचय आणि धनसंचय जोडत मार्गस्थ असलेल्या स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचा प्रसार स्वरूप सहकारच्या माध्यमातून महाराष्ट्रभर होऊ दे.
आजपर्यंत ३५० कोटींच्या ठेवी संस्थेत जमा झाल्या आहेत. या ठेव वृद्धी मासात मोठ्या प्रमाणावर ठेव संकलन होईल, असा विश्वास संस्था अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला. स्वरूपांजली ठेव योजना १२ ते १८ महिने सर्वसाधारण ८.५० टक्के व ज्येष्ठ नागरिक व महिला ९ टक्के, सोहम ठेव योजना १९ ते ३६ महिने (मासिक व्याज) ८.२५ टक्के व ज्येष्ठ नागरिक व महिला ८.५० टक्के दर मिळणार आहे.
या ठेव योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक ठेवीदारांनी करावी व संस्थेच्या आकर्षक ठेव योजनांचा लाभ घ्यावा, अशी माहिती दिली. कार्यक्रमाला उपाध्यक्ष माधव गोगटे, संचालक प्रसाद जोशी, शैलेश काळे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 20-06-2025














