मंडणगड : तुळशी घाटात दरड कोसळली

मंडणगड : मंडणगड तालुक्यात गुरुवारी (ता. १९) सकाळपासून मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने त्याचा परिणाम दैनंदिन जीवनमानावर झाला आहे. पावसामुळे मंडणगड-दापोली राज्यमार्गावरील केळवत घाटात मोठे झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आंबडवे-राजेवाडी राष्ट्रीय मार्गावरील तुळशी घाटात दरड रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. भिंगळोली येथील विश्रामगृहाजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.

केळवत व माहू तुळशी या प्रमुख मार्गावरील वाहतुकीचा अडथळा दूर करण्यासाठी आपत्कालीन विभागाने कार्यवाही करत झाड, दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. तालुक्यात दमदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी केले असून, भारजा, निवळी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकिनाऱ्यावरील भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या असून, त्यांचे पंचनामे सुरू आहेत.

तालुक्यातील शाळांना शाळा भरवून त्यानंतर लगेचच सोडून देण्यात आले. विजेचा मात्र पावसाळ्यात सुरवातीपासून खेळखंडोबा सुरू आहे तो अद्याप अविरत आहे, त्यामुळे महावितरणच्या कामकाजासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिक महावितरणाच्या नियमित सुरू असलेल्या कामकाजासंदर्भात नाराजी व्यक्त करत आहेत. दरड बाजूला करण्यासाठी आपत्कालीन महसूल विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग, महामार्ग प्राधिकरण यांनी परिश्रम घेतले. चोवीस तासांत ९५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत तालुक्यात ५८५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 20/Jun/2025