संगमेश्वर : तुरळ कडवई पुलानजीक संरक्षण भिंत कोसळली

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गानजीक असणाऱ्या तुरळ कडवई रस्त्यावरील पुलानजीकची संरक्षण भिंत मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याने यावर असणाऱ्या विद्युतवाहिनीसह रिक्षास्टँडला धोका निर्माण झाला आहे. भविष्यात ही जागा खचल्यास गेली चाळीस वर्षे व्यवसाय करणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांचा व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई-गोवा महामार्गानजीक तुरळ-कडवई पुलानजीक काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली संरक्षण भिंत ही नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरात वाहून गेली आहे. या भिंतीवरूनच तुरळ येथील नियोजित पंपाची वीजवाहिनी जात असून, या वीजवाहिनीचा खांब भरावात वाहून गेल्याने उघडा पडला आहे. याला तात्पुरता आधार देण्यात आला असून, भविष्यात हा खांब पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तसेच या भिंतीलगतच कडवई-तुरळ पंचक्रोशीतील रिक्षा व्यावसायिक गेल्या चाळीस वर्षांपासून व्यवसाय करत आहेत. भविष्यात जमिनीची धूप होऊन ही जागा घसरल्यास रिक्षा व्यावसायिकांची फार मोठी अडचण होऊ शकते तरी सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांनी याकडे विशेष बाब म्हणून लक्ष घालून ही भिंत पूर्ववत करावी, अशी विनंती रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 20/Jun/2025