चिपळूण तालुक्यात राबवणार ‘जलतारा’ योजना

चिपळूण : दरवर्षी अपेक्षेपक्षा जास्त पाऊस पडूनही रत्नागिरी जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतीचे ते मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यावर उपाय म्हणून तालुक्यात जलतारा योजना राबवण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनी दिली.

बेसुमार वृक्षतोड व पर्यायाने कमी झालेली भूजल पातळी याला कारणीभूत आहे. यासाठीच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत भूजल पातळी वाढवण्यासाठी गावातील शेतामध्ये “जलतारा” योजना राबवण्यात येणार आहे. चिपळूण तालुक्यात काही शेतकऱ्यांकडून जलतारा योजनेंतर्गत शोषखड्डे निर्माण केले जात आहेत. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत झिरपण्यास मदत होणार आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतजमिनीत पाच चौरस फूट आकाराचा शोषखड्डा खोदावा लागणार असून, या कामाची मजुरी म्हणून शेतकऱ्यांना मोबदला मिळणार आहे. ‘जलतारा’ योजना राबवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्यास अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचून राहते, ज्यामुळे शेतकरी मोठ्या नुकसानीला तोंड देतात. ‘जलतारा’ योजनेतून पाणी निचरा करण्याची प्रक्रिया साधली जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी योग्यप्रकारे व्यवस्थापित होऊन त्याचा योग्य वापर होतो. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे किमान एक एकर जमीन आवश्यक आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षकांशी संपर्क साधावा.

शेतकऱ्याला ४ हजार ८०० रुपये
जलतारा योजनेंतर्गत पाच चौरस फूट आकाराचा आणि सहा फूट खोल खड्डा खोदल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात या कामाची मजुरी म्हणून चार हजार ८०० रुपयांची रक्कम जमा करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना सातबारा, आठ अ, आधारकार्ड आणि एमआरईजीएसचे जॉबकार्ड आदी कागदपत्रे लागणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 20/Jun/2025