Sunjay Kapoor Last Rites: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे एक्स पती आणि बिजनेसमॅन संजय कपूर यांचं १२ जून रोजी निधन झालं. लंडनमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अवघ्या ५३व्या वर्षी संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
पोलो गेम खेळताना मधमाशी तोंडात गेली आणि तिने डंख मारल्याने संजय कपूर यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (१९ जून) निधनानंतर ७ दिवसांनी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
संजय कपूर यांच्या अंत्यदर्शनासाठी कपूर कुटुंबीय दिल्लीत पोहोचले. करिश्मा कपूर आपल्या दोन्ही मुलांसह संजय कपूर यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाली होती. एक्स पतीला अखेरचा निरोप देताना करिश्मा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. तर वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी समायरा आणि कियान यांनाही अश्रू अनावर झाले. करिश्माने तिच्या दोन्ही मुलांना धीर दिला.
संजय कपूर यांच्या अंत्यसंस्कारावेळी करीना कपूर आणि सैफ अली खानही उपस्थित होते. करिश्मा भावुक झाल्यानंतर करीनाने बहिणीला आधार देत तिला सांभाळलं. संजय कपूर यांची पत्नी प्रिया सचदेवही उपस्थित होती. संजय कपूर यांची शोकसभा २२ जून रोजी दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे.
दरम्यान, संजय कपूर यांनी २००३ मध्ये करिश्मा कपूरशी लग्न केलं होतं. मात्र २०१६ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यांना समायरा आणि कियान ही दोन मुले आहेत. करिश्मासोबत हे त्यांचं दुसरं लग्न होतं. करिश्माशी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी मॉडेल प्रिया सचदेवशी संसार थाटला होता. त्यांना सफिरा आणि अजारियस ही दोन मुले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 20-06-2025














