शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू : उद्धव ठाकरे

मुंबई : मुंबई त्यांच्या हाती जाऊ देणार नाही. तुम्ही राज्यात शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर भाजपचे नामोनिशान पुसून टाकू, असा इशारा उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिला.

उद्धवसेनेचा ५९ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी खा. संजय राऊत, आ. भास्कर जाधव, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचीही भाषणे झाली. कर्नल सोफिया कुरेशी यांना पाकिस्तानी दहशतवाद्यांची बहीण म्हणणाऱ्या भाजपचे हिंदुत्व काय आहे? पहेलगाममध्ये चार अतिरेकी कसे घुसले? दहशतवादी पातळात गेले, आकाशात गेले की भाजपमध्ये गेले?, असा सवाल ठाकरे यांनी केला.

आमच्या पक्षाचे खासदार का पाठवले?
केंद्रात सरकार आल्यापासून मंदिराचे छत गळाले, विमान अपघात झाला, रेल्वे अपघात होऊनही कोणी जबाबदारी घेत नाही. मेट्रोत पाणी भरले. पंतप्रधानांना कठोर शब्दात बोलणे योग्य नाही. परंतु, इंडियन मुजाहिद्दीनबरोबर आमची तुलना केली. तसे आहोत तर तुम्ही न केलेल्या शौर्याचे कौतुक जगात सांगायला आमच्या पक्षाचे खासदार का पाठवले? असा सवाल ठाकरे यांनी केला.

वादा खरा होता की खोटा?
पक्ष चोरला, चिन्ह चोरले तरी उद्धव ठाकरे संपत कसा नाही हा प्रश्न विरोधकांना सतावत आहे. पैसा फेको, तमाशा देखो असे त्यांचे राजकारण सुरू आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने जनतेशी केलेला वादा पाळला नाही. मग, २०१९ साली माझ्याशी केलेला वादा कसा पाळेल? जनतेशी केलेला वादा खरा होता की खोटा? लाडकी बहिणीसाठी निधी नाही. एसटीला निधी नाही. शेतकऱ्यांची कर्जे माफ केली नाहीत. कचऱ्यावर कर लावत आहेत. मात्र, धारावीच्या बिल्डरला सगळे माफ आहे. ‘क्या हुवा तेरा वादा’ हे उद्धवसेनेचे आंदोलन घराघरात पोहोचवा आणि सरकारला जाब विचारा, असे आवाहन त्यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 20-06-2025