राजापुरात महानेट सेवा केबल काही वर्षांपासून रस्त्यावर पडून

राजापूर : तालुक्याच्या पूर्व परिसरात टाकण्यात आलेली शासनाची महानेट सेवा अद्यापही सुरू झालेली नसली तरी दुसरीकडे या सेवेची केबल मागील काही वर्षे जमिनीवर पडून असल्याने नेमका हा विभाग कुणाच्या अधिकार क्षेत्राखाली येतो, असा खोचक सवाल आता जनमानसातून विचारला जात आहे.

तालुक्याच्या पूर्व भागात महानेट सेवा दिली जाणार असल्याने यापूर्वी ओणी अणुस्कुरा मार्गावर रस्त्याला लगतच त्या सेवेचे पोल उभारण्यात आले होते. शिवाय त्यावरून केबल देखील टाकण्यात आली आहे. प्रदीर्घकाळ लोटला तरी ती सेवा अद्यापही सुरू झालेली नाही. मात्र अनेक ठिकाणी रस्त्यावर केबल लोंबताना दिसत आहे. रायपाटण, टक्केवाडीमधील एका वळणावर तर ती केबल गेली तीन, चार वर्षे जमिनीवर पडली आहे. एवढे होऊनदेखील त्याकडे लक्ष द्यायला संबंधित विभागाला वेळ नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

शासनाची महानेट सेवा नेमकी कुणाच्या अखत्यारीत येते, त्यावर कुणाचे नियंत्रण आहे, असे खोचक सवाल आता विचारले जात आहेत. यापूर्वी प्रशासनाकडे त्याबाबत विचारणादेखील करण्यात आली होती. मात्र समर्पक उत्तरे काही मिळाली नव्हती. महानेट सेवा अद्याप सुरू झालेली नाही. काही ठिकाणी केबल रस्त्यावर येऊन पडली आहे. पण त्याबाबत कुणी योग्य कार्यवाही करायला तयार नाही असे चित्र कायम आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 20/Jun/2025