रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात अवैध दारू विक्रीवर सुरू असलेल्या कारवाईचा भाग म्हणून काल, १९ जून २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीवर गावठी हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अलेटीवाडीकडे जाणाऱ्या जंगलमय भागातील झुडुपांच्या आडोशाला करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई सोमनाथ दत्तात्रय खाडे (पोशि/८४३, नेमणूक संगमेश्वर पोलीस ठाणे) यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, प्रमोद बाळकृष्ण चव्हाण (वय ५०, रा. कळंबुशी, अलेटीवाडी, ता. संगमेश्वर) हा आपल्या ताब्यात बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू बाळगून असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकला असता, प्रमोद चव्हाण दारूसह मिळून आला. त्याच्या ताब्यातून ९०० रुपये किमतीची ८ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी १९ जून २०२५ रोजी रात्री १०:२४ वाजता संगमेश्वर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) नुसार गुन्हा (गु.र.नं. ८७/२०२५) दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि निर्मिती रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सक्रिय असून, अशा गैरकृत्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील. नागरिकांनीही अशा बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 20-06-2025













