स्वच्छ सर्वेक्षण २०२५ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत चिपळुणात प्लास्टिक मुक्त चिपळूण शहर उपक्रम

चिपळूण : स्वच्छ सर्वेक्षण २०२५ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्लास्टिक मुक्त चिपळूण शहर उपक्रमाचे आयोजन २० जून रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत करण्यात आले आहे. नगर परिषद प्रशासन व प्रांत कार्यालयाच्या वतीने हे अभियान राबविले जाणार आहे. यामध्ये शहरातील शैक्षणिक संस्थांसह सामाजिक संस्था सहभागी होणार आहेत. तसेच नगर परिषदेने स्वच्छतेचा बॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून सन्मान केलेले अभिनेते ओंकार भोजने हेदेखील या अभियानात सहभागी होणार आहेत.

या उपक्रमाला शुक्रवारी सकाळी ८ वा. सुरुवात होणार आहे. त्यानुसार शहरातील विविध भागात सकाळी ८ वा. पासून वेगवेगळ्या समूहांच्या माध्यमातून हे अभियान राबविले जाणार आहे. त्यानुसार प्रामुख्याने शहरातील सर्व भागातील प्लास्टिकचा कचरा जमा केला जाणार आहे.

त्याचबरोबर अन्य स्वच्छताही करताना कचऱ्याचे वर्गीकरण केले जाणार आहे. त्यामध्ये ओला व सुका कचरा, प्लास्टिक कचरा व काच तसेच अन्य टाकाऊ सामान वेगळे करून स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. यामध्ये शहरातील सर्व शैक्षणिक संस्थांसह सामाजिक, क्रीडा, सांस्कृतीक आदी संस्था व त्यांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. कचरा संकलन व स्वच्छता मोहीम सकाळी ८ ते १० या वेळेत अकरा ठिकाणी राबविली जाणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते १०.३० या वेळेत गांधारेश्वर तिठा परिसरात वृक्षारोपण होणार आहे. त्यानंतर घंटागाडी कचरा संकलन मोहिमेमध्ये कर्मचाऱ्यांसोबत बॅण्ड अॅम्बेसेडर ओंकार भोजने शहरामध्ये सहभागी होणार आहेत. अभिनेते ओंकार भोजने यांच्याहस्ते एकल प्लास्टिक वापर बंदीबाबत माहिती पत्रके वाटण्यात येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 20/Jun/2025