चिपळूण : पेढे गावातील चिखल जेसीबीने हटविण्यास सुरुवात

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट पावसाळ्यात धोकादायक बनण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. घाटात रस्ता खचलेल्या भागाला संरक्षण म्हणून उताराच्या बाजूस गॅबीयन वॉल उभारण्यात येत आहे. मात्र, भर पावसात ही गॅबीयन वॉलच ढासळू लागल्याने त्यातील माती पाण्याबरोबर पायथ्याशी असलेल्या ग्रामस्थांच्या शेतात व घर परिसरात आली. पावसाळ्यात या गॅबीयन वॉलची दुरुस्ती होऊ शकत नसल्याने धोका कायम आहे. त्यामुळे पायथ्याशी शेत व घर परिसरात आलेला चिखल जेसीबीच्या साह्याने काढण्यात येत आहे.

परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात धोकादायक ठिकाणी संरक्षक लोखंडी जाळ्या आणि उताराच्या बाजूस गॅबीयन वॉल उभारण्यात येत आहे. गत पावसाळ्यात येथील गॅबीयन वॉल कोसळली होती. तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात ती पुन्हा ढासळली आहे. गॅबीयन वॉल कोसळू नये, तसेच तेथून पाण्यासोबत माती वाहू जाऊ नये, यासाठी तेथे प्लास्टिक टाकण्यात आले आहे. मात्र, तरीही तेथील माती पाण्यासोबत लोकवस्तीत येत आहे. पेढे येथील लोकवस्तीत व शेतात चिखल साचल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बुधवारी हा चिखल काढण्याचे काम सुरू झाले आहे.

परशुराम घाटात केलेल्या उपाययोजना तोकड्या असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पावसाळ्यापूर्वीच गॅबीयन वॉलचे काम मार्गी लागण्याची आवश्यकता होती. मात्र हे काम मार्गी न लागल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. ठेकेदाराच्या ढिसाळ कारभाराबाबत ग्रामस्थांनी आता आक्रमक भूमिका घेण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यासाठी गावाची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे.

परशुराम घाटातील गॅबीयन वॉल कामाची दुरुस्ती आता पावसाळ्यानंतरच करावी लागेल. तत्पूर्वी सुरक्षेचा उपाय म्हणून तेथे प्लास्टिकचे आच्छादन केले आहे. पेढे ग्रामस्थांच्या शेतात व घरालगत आलेला गाळ, चिखल हा जेसीबीच्या माध्यमातून काढण्यात येत आहे. घाटातील वाहतूक नियमित सुरक्षितपणे सुरू राहील, याची दक्षता आम्ही घेत आहोत-पंकज गोसावी, शाखा अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग, महाड

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 20/Jun/2025