खेड : तालुक्यात मुसळधार पावसाने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, शहरातील जगबुडी नदीने गुरुवारी दुपारी १ वाजता धोका पातळी गाठली. या नदीची धोका पातळी ७ मीटर असून, दुपारी ४ वाजता नदीचे पाणी ९.९० मीटरवरून वाहत होते.
यामुळे खेड शहरात नदी किनारी असलेल्या मटण, मासळी बाजारात व बाजारपेठेत पाणी शिरले आहे.
बुधवारी दिवसभर उघडीप दिलेल्या पावसाने रात्री उशिरा संततधार सुरू केली होती. गुरुवारी पहाटे ६ वाजल्यापासून ९ वाजेपर्यंत जगबुडीची पाणी पातळी ६.४० मी. एवढी स्थिर होती. मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे सकाळी ९ वाजता त्यामध्ये वाढ होऊन ६.७० मी. एवढी झाली. दरम्यान, पावसाचा जोर कमी झाल्याने सकाळी पुन्हा एकदा पाण्याची पातळी कमी होऊन ६.५० मी. झाली. मात्र पुन्हा एकदा पाऊस मुसळधार कोसळून नदीची पातळी ११ वाजता ६.८० मी., तर दुपारी १२ वाजता ६.९० मी. एवढी झाली.
यावर्षी १५ मेपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसाने जगबुडीची इशारा पातळी गाठली होती. मात्र मान्सून नियमित झाल्यानंतर पहिल्यांदा जगबुडीने दुपारी १ वाजता धोका पातळी गाठली. जगबुडी व नारंगी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्यामुळे खेड-दापोली मार्गावर सुर्वे इंजिनिअरिंगनजीक रस्त्यावर दुपारी पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. पावसाची संततधार सुरूच राहिल्याने जगबुडी नदीची पाणी पातळी ४ वाजता ९.९० मीटरपर्यंत गेली होती. त्यामुळे खेड बाजारपेठेतील निवाचा चौक, गांधी चौक सफा मस्जिद चौक, वाल्की गल्ली या ठिकाणी पाणी भरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानातील माल सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरुवात केली.
खेड-दापोली वाहतूक ठप्प
नारंगी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने खेड-दापोली मार्गालगतचा संपूर्ण परिसर जलमय झाला. खेडहून दापोली व मंडणगडकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. खेड – बहिरवली मार्गावरील सुसेरी रस्त्यावर पाणी आल्यामुळे खाडीपट्ट्याकडे जाणारा मार्ग बंद झाला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:44 20-06-2025













