सासरच्यांना धडा शिकविण्याकरिता पोलिस तक्रार रामबाण उपाय झाला : हायकोर्ट

नागपूर : कौटुंबिक वादानंतर सासरच्या मंडळींना धडा शिकविण्यासाठी पोलिस तक्रारीचा रामबाण उपाय म्हणून वापर केला जात आहे. आजकाल विवाहितांमध्ये ही प्रवृत्ती फार वाढल्याचे निदर्शनास आले आहे, असे परखड मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात व्यक्त केले.

बरेचदा पतीच्या नातेवाइकांवर वाईट हेतूने गंभीर स्वरूपाचे आरोप केले जातात. त्यामुळे त्यांना निरपराध असतानाही फौजदारी कारवाईच्या यातना सहन कराव्या लागतात. त्यांना जाणीवपूर्वक कौटुंबिक छळाच्या गुन्ह्यांमध्ये गोवले जाते, असेदेखील न्यायालय म्हणाले. न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व प्रवीण पाटील यांनी हा निर्णय दिला. विवाहिता सीमा आवारे यांच्या तक्रारीवरून वाशिम जिल्ह्यातील अनसिंग पोलिसांनी ३० ऑगस्ट २०२३ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील गोरेगाव येथील पती संदीप, सासरा देवीदास, सासू कमलाबाई व इतर पाच जणांविरुद्ध हुंड्यासाठी छळ व इतर संबंधित गुन्ह्यांचा एफआयआर नोंदविला होता. तसेच, न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायालयाला पती वगळता इतर सर्व आरोपींवर अपमानास्पद वागणूक देणे, पतीला चिथावणी देणे असे सामान्य स्वरूपाचे आरोप केले गेले असल्याचे आणि तक्रारीमध्ये वेळ, तारीख, ठिकाण, छळाचे स्वरूप इत्यादीबाबत विस्तृत माहिती दिली गेली नसल्याचे आढळून आले. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता संबंधित परखड मत व्यक्त करून पती वगळता इतर सर्व आरोपींविरुद्धचा एफआयआर व खटला रद्द केला.

पतीवरील खटला कायम
सीमा यांचे सर्व मुख्य आरोप पती संदीपविरुद्ध असल्याचे निदर्शनास आल्यामुळे न्यायालयाने संदीपविरुद्धचा एफआयआर व खटला कायम ठेवला. या दाम्पत्याचे २ जून २०१४ रोजी लग्न झाले आहे. वाद विकोपाला गेल्यामुळे पतीने घटस्फोटासाठीही याचिका दाखल केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:44 20-06-2025