रत्नागिरी : पुण्यातील इंद्रायणी नदीवरील साकव दुर्घटनेनंतर साकवांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील कुंचाबे येथील साकवावर गेल्या ४७वर्षांत एकही रुपया खर्च करण्यात आलेला नसल्याची बाब समोर आली आहे. सुमारे दहा हजार ग्रामस्थ अवलंबून असलेल्या या साकवाच्या दुरुस्तीची मोठी गरज आहे.
पुण्यातील साकव दुर्घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण भागातील सर्व साकवांच्या बांधकामाची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानंतर प्रशासनाकडून तातडीने साकवांच्या दुरुस्तीसाठी सर्वेक्षणाची धावपळ सुरू झाली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये यावर्षी जिल्ह्यातील ६०८ साकव दुरुस्तीच्या पटलांवर आले आहेत.
दरम्यान, संगमेश्वर तालुक्यातील कुंचाबे येथे १९७८ साली बांधण्यात आलेल्या साकवांर आजपर्यंतही एकही रुपया खर्च करण्यात आलेला नाही, या साकवावर कुटरे, नांदगाव, गोवळ, पाते, तळवडे, येगाव या गावांमधील सुमारे दहा हजार ग्रामस्थ अवलंबून आहे. या साकवाची दयनीय अवस्था झाली असून, त्याकडे वेळीच लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.
अनेक दुर्गम वाडीवस्त्यांना जोडण्यासाठी साकव बांधण्यात आले आहेत. जिल्ह्यातील मोठे वहाळ, नदीनाले, पन्ऱ्यांवर साकव आहेत. अनेक ठिकाणी मुलांना शाळा-महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी तसेच दळणवळणासाठी साकवांचा वापर होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व साकवांचे पुनःसर्वेक्षण करणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्वेक्षणानंतर त्याबाबत आवश्यक तो निर्णय घेतला जाईल- वैदेही रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:48 PM 20/Jun/2025













