रत्नागिरी : मराठा समाजाला सगेसोयरे सरसकट कुणबी दाखले देण्याच्या शासन निर्णयाला कोकणातील कुणबी व अन्य ओबीसींनी विरोध दर्शवला आहे. गणगोत सगे-सोयरे असे ढोबळ शब्द कायद्यात बसविणे हे नैतिकदृष्ट्या, कायदेशीररीत्या अयोग्य अन्यायकारक ठरणारे आहे. राज्य सरकार विधानसभा निवडणुकीपूर्वी ही अधिसूचना काढण्याच्या तयारीत आहे. ती अधिसूचना रद्द करावी, अन्यथा कोकणातील कुणबी व अन्य ओबीसींतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा रत्नागिरी यांच्यावतीने रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना सोमवारी यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. जातीय जनगणना केली पाहिजे अशीही यावेळी मागणी करण्यात आली आहे. त्यावेळी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सुर्यकांत गोताड, रत्नागिरी तालुका ग्रामीण शाखेचे अध्यक्ष रामभाऊ गराटे, सचिव विनायक शिवगण, खजिनदार गजानन धनावडे, माजी उपसभापती सुनील नावले, रवी रामगडे, उपाध्यक्ष श्रीकांत मांडवकर, शांताराम मालप, रवींद्र मांडवकर, शशिकांत म्हादे, तानाजी कुळये आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सगेसोयरे संदर्भात अधिसूचनेच्या तरतुदीला विरोध करणाऱ्या १० लाखांपेक्षा जास्त हरकती राज्यशासनाकडे नोंदविल्या गेल्या आहेत.
सगेसोयरे अधिसूचनेच्या मसुद्याला अंतिम स्वरुप देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे हे पुन्हा जून व सप्टेंबरमध्ये उपोषणाला बसले होते. राज्य सरकार विधानसभा निवडणुकीपूर्वी ही अधिसूचना काढणार असल्याचे समजते. परंतु, याला आमचा कडाडून विरोध राहील, असे कुणबी समाजोन्नती संघाच्या वतीने ठणकावले आहे.
बोगस दाखल्यांची चौकशी करावी
मराठा जातीच्या ५७ लाख कुणबी नोंदी सापडल्याचा आधार घेऊन मराठा हे कुणबीच असल्याचे आदेश काढावेत, अशीही मनोज जरांगे यांनी मागणी केली आहे. ती पूर्णत चुकीची आहे. वास्तविक या कुणबी नोंदींच्या आधारे देण्यात आलेल्या जातीच्या दाखल्यांबाबत शासनाने श्वेत पत्रिका काढावी व बोगस दाखल्यांची चौकशी करून ते जातीचे दाखले रद्द करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 15/Oct/2024









