रत्नागिरी : अणुऊर्जेचा (न्युक्लियर एनर्जी) उपयोग आणि समाजासाठी होणारे फायदे याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि त्यांना शिक्षित करण्यासाठी न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल) तर्फे ‘अॅटम ऑन व्हील्स’ या विशेष मोहिमेअंतर्गत मोबाइल प्रदर्शनाला जिल्ह्यात अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हे प्रदर्शन मार्चपासून जून महिन्यापर्यंत सुरू होते.
रत्नागिरी जिल्हाधिकारी येथे कार्यालयाच्या आवारातून मार्चमध्ये हे अभियान सुरू करण्यात आले. या मोहिमेंतर्गत एक विशेष मोबाइल एक्झिबिशन बस मान्यवरांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आली. प्रथम दोन महिन्यांमध्ये ११३ गावांतील २५,०९७नागरिकांना पॅनल्स, एलईडी टीव्ही, ऑडिओ व्हिडीओ प्रोजेक्शन सिस्टीम, प्रचारपत्रके इत्यादींच्या माध्यमातून अणुऊर्जेच्या विविध उपयोगांविषयी माहिती देण्यात आली आणि जागरूक करण्यात आले. मे आणि जून महिन्यात अॅटम ऑन व्हील्स मोबाइल प्रदर्शन ७१ गावांमधील जवळपास ९,९०० लोकांपर्यंत पोहोचले. आतापर्यंत जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर या तालुक्यातील शाळा, गावे, बाजारपेठा, सामुदायिक केंद्रे, पंचायत भवन इत्यादी ठिकाणी भेट देऊन एकूण १८४ गावांमधील जवळपास ३४,९०० लोकांना अणुऊर्जेच्या विविध पैलूंबद्दल जागरूक करण्यात आले आहे.
या जनजागृती मोहिमेदरम्यान शालेय विद्यार्थी, महिला, युवक, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नागरिक तसेच रुग्णालये व इतर संस्थांतील कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विशेष जनजागृतीसाठी या मोहिमेत अणुऊर्जेच्या वैज्ञानिक पैलू व सुरक्षिततेसंबंधी अनेक शैक्षणिक व अॅनिमेशन चित्रपटही या प्रदर्शनात दाखवण्यात आल्या. अणुऊर्जेशी संबंधित विविध विषयांवर तयार करण्यात आलेल्या सर्जनशील माहितीपत्रकांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. याव्यतिरिक्त, या बसमध्ये सोबत असलेल्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मनातील अणुऊर्जेशी संबंधित शंका, उत्सुकता व गैरसमज दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
अखेरच्या टप्प्यात राजापूर, सिंधुदुर्ग अभियानाच्या शेवटच्या टप्प्यात ही मोबाइल बस रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका तसेच सिंधुदुर्ग जिल्हा गाठून वैभववाडी तालुक्यातील टप्प्याटप्प्याने अनेक गावांतील हजारो लोकांपर्यंत पोहोचून अणुऊर्जेबाबत जनजागृती करणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:37 PM 20/Jun/2025













