पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निश्चित केलेले २०४७ चे विकसित भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँकिंग क्षेत्राला मोठे योगदान द्यावे लागेल. आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, पर्यावरण शाश्वतता आणि उत्तम प्रशासन हे विकसित भारताचे महत्त्वाचे घटक आहेत.
हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँका आपल्या माध्यमातून गती देऊ शकतील, असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी व्यक्त केले. पुण्यात स्थापन झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या ९० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागाराजू आणि बँकेचे व्यवस्थापकीय संचालक निधू सक्सेना उपस्थित होते.
सीतारामन म्हणाल्या, पायाभूत सुविधांचा विकास व विस्तार, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) गरजेनुसार वित्तपुरवठा करणे, अद्यापही बँकिंग व्यवस्थेपासून दूर असलेल्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांनाही बँकिंगच्या जाळ्यात आणणे आणि सर्व नागरिकांना विमा कवच पुरवण्यावर भर देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानामुळे भारतीय बँकिंग व्यवस्थेचे चित्र बदलत आहे. याद्वारे ग्राहकांना सुरक्षित, सुलभ डिजिटल बँकिंगचा अनुभव मिळत आहे. या यंत्रणा अधिक भक्कम व सुलभ आणि विश्वसनीय बनविणे गरजेचे आहे. मात्र, असे करतानाच बँकांना आपल्या डिजिटल यंत्रणा हॅक होणार नाहीत आणि ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी पुरेशी भक्कम सुरक्षाप्रणाली विकसित करायला हवी. डिजिटल यंत्रणेवरील हल्ल्यासारखे प्रसंग घडल्यास त्याला कसे उत्तर द्यायचे, याचा सरावही बँकांनी करणे आवश्यक आहे.
बँकांनी ग्राहककेंद्रित यंत्रणा आणि प्रणाली विकसित करून ग्राहकांना अधिकाधिक समाधान मिळावे, यावर भर द्यावा, तसेच भविष्यातील विकासासाठी आवश्यक गरजा लक्षात घेता बँकांनी भांडवलवृद्धी करण्यावर भर द्यावा, असे अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू यांनी सांगितले.
येत्या पाच वर्षांत आणखी एक हजार शाखा सुरू करण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे. ग्राहकाभिमुख सेवा नावीन्यपूर्ण उत्पादने व सेवा यावर बँकेचा भर राहील, असे बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक निधू सक्सेना यांनी सांगितले.