राजापूर : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

राजापूर : मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाच्या दबावतंत्राला बळी पडून मराठा समाजाच्या ओबीसीकरणासाठी मराठा समाजाच्या सगेसोयऱ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना अंतिम करण्याच्या शासन निर्णयाला आमचा विरोध आहे. तशी अधिसूचना काढल्यास त्याविरोधात कोकणातील कुणबी व अन्य ओबीसी समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा राजापूरतर्फे देण्यात आला आहे. या बाबतचे निवेदन कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ग्रामीण शाखा तालुका राजापूरतर्फे येथील तहसीलदार विकास गंबरे यांना देण्यात आले.

कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ग्रामीण शाखा तालुका राजापूरचे अध्यक्ष दीपक नागले यांच्या हस्ते तहसीलदार श्री. गंबरे यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी समाजोन्नती संघ ग्रामीण शाखा राजापूरचे सचिव चंद्रकांत जानस्कर, राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे चेअरमन प्रकाश मांडवकर, कुणबी समाजोत्रती संघ ग्रामीण शाखा तालुका राजापूर कार्यकारिणी सदस्य वसंत आंबेलकर, उपाध्यक्ष रमेश सूद, सत्यवान कणेरी, प्रकाश कुवळेकर, सुरेंद्र तांबे, मोहन पाडावे, अनिल करंगुटकर, संतोष तांबे यांच्यासह मोठ्या संख्येने कुणबी ज्ञाती बांधवांसह ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

दि. २६ जानेवारी, २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम २०१२ याच्या नियम २ व्याख्यामधील खंड ‘ज’ नंतर समाविष्ट करण्यात येणारा ज एक’ हा उपखंड तसेच नियम क्र. ५ मधील उपनियम (६) मध्ये जोडण्यात येणाऱ्या तरतूदीबाबत एक अधिसूचनेचा मसूदा प्रसिद्ध केला होता. त्यावर दि. १६ फेब्रुवारी, २०२४ पर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या.

या अधिसूचनेच्या तरतूदीला विरोध करणाऱ्या १० लाखापेक्षा जास्त हरकती राज्यशासनाकडे नोंदविल्या गेल्या आहेत. असे असताना सगेसोयरे अधिसूचनेच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे हे पुन्हा दि. ८ जूनपासून व १७ सप्टेंबर, २०२४ पासून उपोषणाला बसले होते.

या अधिसूचनेला अंतिम स्वरुप देण्याचे राज्यसरकारने आश्वासन दिले आहे. राज्य सरकार विधानसभा निवडणुकीपूर्वी ही अधिसूचना काढणार असल्याचे समजते. ही अधिसूचना काढू नये. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 15/Oct/2024