नागपूर : आई-वडिलांना मुलांकडून पोटगी मागायची असल्यास त्यांनी मुलांसोबतच राहिले पाहिजे हे कायद्याने बंधनकारक नाही. ते स्वतंत्र ठिकाणी राहूनही मुलांना पोटगी मागू शकतात.
पोटगीसाठी मुलांसोबत राहणे अनिवार्य केल्यास पालकांचा शांतपणे जीवन जगण्याचा अधिकार हिरावला जाऊ शकतो, असे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. जोशी यांनी एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले.
या प्रकरणातील मुलाने त्याची आई मुलीसोबत राहत असल्यामुळे ती पोटगी मिळण्याकरिता पात्र नाही, असा दावा केला होता. न्यायालयाने मातापिता व ज्येष्ठ नागरिक निर्वाह कायद्याकडे लक्ष वेधून हा दावा फेटाळून लावला. मुलगा आईचे पालनपोषण करण्याचे कर्तव्य विसरल्यामुळे तिला नाइलाजास्तव मुलीच्या घरी आसरा घ्यावा लागला. मुलासोबत राहण्यास नकार दिल्यामुळे ती पोटगीसाठी अपात्र ठरत नाही. मुलांसोबत राहण्याची अट ठेवल्यास कायद्याच्या उद्देशाची पायमल्ली होईल. मुलांकडून शारीरिक-मानसिक छळ होत असतानाही पालकांना पोटगी मागण्यासाठी मुलांसोबत राहण्यास बाध्य व्हावे लागेल, असे न्यायालयाने नमूद केले.
आईने घेतला कायद्याचा आधार
विजय देखभाल करीत नसल्यामुळे त्याच्याकडून पोटगी मिळविण्यासाठी आईने कायद्याचा आधार घेऊन उपविभागीय अधिकाऱ्यांना अर्ज केला होता. त्यामुळे त्यांना ६ एप्रिल २०२३ रोजी मासिक दोन हजार रुपये पोटगी मंजूर करण्यात आली होती. त्याविरुद्ध विजयने जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विजयलाच दणका देताना आईच्या पोटगीत वाढ केली.
विजय आहे दत्तक मुलगा
पीडित आईने विजयला दत्तक घेतले आहे. त्यामुळे विजय हा पीडित आईचा सख्खा मुलगाच झाला आहे. त्याने आईचे पालनपोषण करणे आवश्यक आहे. हे त्याचे केवळ कायदेशीरच नाही, तर नैतिक कर्तव्यदेखील आहे. विजय कुटुंबाचे पालनपोषण करण्यास समक्ष आहे. त्याच्याकडे पुरेशी कृषी जमीन आहे, असेदेखील उच्च न्यायालयाने नमूद केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:21 21-06-2025














