फाटक हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा : ‘निरोगी जीवनासाठी योगाचे आचरण करा’

रत्नागिरी, २१ जून २०२५ : शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी योगाचे महत्त्व अनमोल आहे, त्यामुळे प्रत्येकाने योगाचे दैनंदिन जीवनात आचरण करावे, असे विचार योग प्रशिक्षक नीता साने यांनी फाटक हायस्कूल येथे ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बोलताना व्यक्त केले.

फाटक हायस्कूल आणि श्रीमान वि. स. गांगण कला, वाणिज्य आणि कै. त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या नीता साने यांच्यासह भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी वर्षा ढेकणे, पल्लवी पाटील, सुप्रिया रसाळ, प्रणाली रायकर, मानसी करमरकर, सायली बेर्डे, भक्ती दळी, शैलेश बेर्डे, तसेच मुख्याध्यापक राजन कीर आणि उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

‘एक पृथ्वी एक आरोग्य’ या संकल्पनेवर आधारित योग दिनाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने झाली. प्रमुख पाहुण्यांनी योग दिनाच्या शुभेच्छा देऊन योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. क्रीडा विभाग प्रमुख मंदार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित मान्यवरांसह सहावी आणि दहावीतील विद्यार्थ्यांनी योगासने, कपालभाती, प्राणायाम, ध्यानस्थिती आणि शयनस्थितीतील विविध आसनांची प्रात्यक्षिके सादर केली.

मंजिरी आगाशे यांनी दिलेल्या संकल्प आणि प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार मंदार सावंत यांनी मानले. योगामुळे मिळणारे शारीरिक आणि मानसिक फायदे लक्षात घेता, अशा कार्यक्रमांमुळे समाजात योगाविषयी जागरूकता वाढण्यास मदत होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:21 21-06-2025