रत्नागिरी : ‘त्या’ वायरमनच्या कुटुंबीयांना चार लाखांची भरपाई

रत्नागिरी : जिल्ह्यातील ३९२ कर्मचारी तुमच्याकडे आहेत. मग तुमचे ऑफिस गोरेगावला का, जिल्ह्यात का नाही. महावितरण कंपनी ठेकेदाराला पाठीशी घालत आहे, असा आरोप करीत ठेकेदाराच्या प्रतिनिधीला फणसवळे येथील ग्रामस्थ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी धारेवर धरले. जमाव आक्रमक झाल्यामुळे त्यांच्या रेट्याने महावितरण कंपनीने विजेचा धक्का बसून मयत झालेल्या शिंदे कुटुंबीयांना ४ लाख तर साळवी यांच्या कुटुंबीयांना ४ लाखांच्या भरपाईचा धनादेश दिला.

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत ग्लोबल सर्व्हिसेस प्रायव्हेट लि. कंपनीच्या ठेकेदाराने उपाहासात्मक शब्द वापरल्याने बने संतप्त होत थेट त्यांच्या अंगावर गेले; परंतु पोलिसांनी त्यांना सावरले.

कुंदन शिंदे यांच्या मृत्यूनंतर झालेल्या बैठकीमध्ये मयत कुंदन यांच्या कुटुंबीयाला ४ लाखांची भरपाई, नात्यातील एकाला कंपनीत कामाला, पेन्शन आणि ठेकेदार कंपनीकडून २५ लाखांची भरपाई देण्याचा मागणी केली होती. परंतु या विषयाचा पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे आज पुन्हा फणसवळे ग्रामस्थ, नातेवाईक महावितरण कंपनीवर धडकले. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पहिल्या बैठकीत जे इतिवृत्त झाले त्या प्रमाणे काय काय केले सांगा.

ठेकेदाराने ४ लाखांच्या भरपाईची पूर्तता केली. पेन्शनसाठी पेपर दिले, पीएफ वरही पेन्शन योजना आहे, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत विचारणा केली असता, आम्ही एक तरी हॅण्डग्लोज दिले, इतर ठेकेदार काही देत नाहीत असे ठेकेदार प्रतिनिधी बोलल्यावर बने प्रचंड संतापले कोणतीही सुरक्षा नाही, एक हॅण्डग्लोज देऊन आमच्यावर उपकार करताय. असे म्हणत धारेवर धरले.

एवढ्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आले. त्यांनी देखील ठेकेदार आणि महावितरण कंपनीला धारेवर धरले. ठेकेदार कंपनीकडून काय भरपाई देणार, याबाबत येत्या बुधवारी बैठक लावण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 15/Oct/2024