लांजा : कोत्रेवाडी ग्रामस्थांचा निवडणुकांवर बहिष्काराचा निर्णय

लांजा : ग्रामस्थांचा विरोध डावलून कोत्रेवाडी येथे जबरदस्तीने डम्पिंग ग्राउंड प्रकल्प लादण्याच्या नगरपंचायतीच्या भूमिकेविरोधात वारंवार तक्रार अर्ज, आंदोलने करून प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे अखेर ग्रामस्थांनी विधानसभेसह सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याचे निवेदन सोमवारी (ता. १४) तहसीलदार प्रियांका डोले यांना देण्यात आले.

नगरपंचायतीमार्फत कोत्रेवाडी येथे भोंगळ कारभार करून आणि बोगस प्रस्तावाद्वारे वाडीवस्तीजवळ डम्पिंग ग्राउंड प्रकल्प लादून जनजीवन उद्‌ध्वस्त करण्याचा घाट प्रशासनाकडून घातल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या विरोधात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसील कार्यालय, नगरपंचायत प्रशासन यांच्याकडे अनेकवेळा तक्रार अर्ज दिले आहेत. अनेकवेळा या विरोधात आंदोलने, उपोषण करण्यात आले. ग्रामस्थांच्या न्यायहकाकडे नगरपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. कोत्रेवाडी ग्रामस्थ हक्कांसाठी, अन्यायाविरूद्ध दाद मागण्यासाठी

लोकशाही मार्गाने लढत असताना प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणूनच मतदानाच्या अधिकारावर नगरपंचायत, तहसील प्रशासन व अन्य प्रशासनाकडून एकप्रकारे बाधा येत असल्याचे कोत्रेवाडी ग्रामस्थांचे म्हणणे आहे. म्हणूनच आगामी सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कोत्रेवाडी ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार ढोले यांना देण्यात आले. या निवेदनावर तहसीलदार सतीश पेडणेकर, मंगेश आंबेकर, संतोष कोत्रे यांच्यासह ५३ ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

निकषात बसत नसूनही प्रकल्पाचा अट्टाहास का ?
नगरपंचायतीकडे घनकचरा प्रकल्पासाठी इतर अन्य जागांचे प्रस्ताव उपलब्ध असून नगरपंचायत कोत्रेवाडी या एकाच जागेवर अडून बसली आहे. या प्रस्तावित जागेकडे जाण्यासाठी शासनाचा अधिकृत रस्ता नाही आणि लगतच जलस्रोत आहेत तसेच वस्ती जवळ आहे. जागेची पाहणी जिल्हा समितीने करून शासनाच्या निकषात अयोग्य असल्याचा अहवाल यापूर्वीच दिला आहे. असे असताना नगरपंचायतीकडून कोत्रेवाडी येथील जागेवरच अट्टाहास धरला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 15/Oct/2024