घरडा महाविद्यालयात आजपासून अध्यापक विकास कार्यक्रम

चिपळूण : घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि पंडित मदनमोहन मालवीय मिशन अंतर्गत महाविद्यालयातील शिक्षकांच्या प्रशिक्षणाकरिता फॉर कॉर्नर्स ऑफ क्वालिटी हायर एज्युकेशन हा एक आठवड्याचा अध्यापक विकास कार्यक्रम २३ जूनपासून आयोजित केला आहे. त्यामध्ये माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान, ब्लेंडेड क्लासरूम, को-ऑपरेटिव्ह लर्निंग तसेच फॉर्मेटिव्ह असेसमेंट अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे, असे घरडातर्फे सांगण्यात आले.

पद्मश्री कै. डॉ. घरडा यांच्या स्वप्नातून आणि प्रेरणेतून घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही संस्था उभी राहिली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता उत्तम अशी नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती तयार करणे, सर्व शिक्षकांना त्याचे प्रशिक्षण देणे आणि प्रत्येक शैक्षणिक संस्थेतील उपलब्ध संसाधनांमध्ये योग्य असा बदल करून त्याद्वारे शिक्षक-विद्यार्थी आणि एकंदर शिकण्या-शिकवण्याच्या पद्धती यामध्ये आमूलाग्र बदल घडवणे हे या शैक्षणिक धोरणाचा गाभा घटक आहे.

या धोरणाला अनुसरून घरडा महाविद्यालयात अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मूळ मसुदा तयार करणाऱ्या डॉ. कस्तुरीरंजन समितीमधील सदस्य, एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. वसुधा कामत व शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनंत मराठे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अध्यापन विकास कार्यक्रम एसएनडीटी विद्यापीठ आणि घरडा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे. त्यामध्ये पंडित मदनमोहन मालवीय योजनेच्या संचालिका डॉ. जयश्री शिंदे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

हा प्रशिक्षण कार्यक्रम २३ ते २८ जूनदरम्यान घरडा महाविद्यालयात होणार आहे. त्यामध्ये ६० शिक्षकांनी सहभाग नोंदवलेला आहे, अशी माहिती या कार्यक्रमाचे समन्वयक आणि अधिष्ठाता डॉ. नितीन कोळेकर यांनी दिली. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांचे मार्गदर्शन आणि उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील, सर्व विभागप्रमुख यांचे सहकार्य लाभले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 23/Jun/2025