मंडणगडजवळ भीषण अपघात: बुलेरो पिकअपच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू

मंडणगड : मंडणगड तालुक्यातील शिरगाव स्टॉपजवळ २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका ६५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. बुलेरो पिकअपच्या धडकेने ही घटना घडली असून, याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंडणगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाड, रायगड येथील कोंडमालुसरे येथील रहिवासी तुकाराम सिताराम खेडेकर (वय ६९) हे आपली पत्नी जयश्री तुकाराम खेडेकर (वय ६५) यांच्यासोबत मोटारसायकलने (क्र. एम.एच ०४ जे.टी ००५८) पाट येथील मेहुणीच्या कार्यासाठी आले होते. कार्य आटोपून ते पाट येथून शिरगावला जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याने शिरगाव मेन रोडवर आले असता, मंडणगड ते म्हाप्रळ जाणारी बुलेरो पिकअप (क्र. एम.एच ०७ एजे ३४१७) गाडीवरील चालक सौरभ संदिप चौगुले (वय १८, रा. मालवण, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याने त्यांच्या मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली.

या अपघातात जयश्री तुकाराम खेडेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर फिर्यादी तुकाराम खेडेकर यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या आहेत. याप्रकरणी सौरभ संदिप चौगुले याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १०६, २८१, १२५(अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १३२/१७७, १३४(ब), १७७, १८४ नुसार गुन्हा (गु.र.नं. २६/२०२५) दाखल करण्यात आला आहे. मंडणगड पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 23-06-2025