रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथील जयवंत महादेव नाचणकर (वय ५५) यांचा घरात केलेल्या धुरीमुळे श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २० जून रोजी रात्री १०.१० वाजता घडली. त्यांना उपचारासाठी रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी २१ जून रोजी पहाटे १२.५६ वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद (आमू. क्रमांक ४८/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे) करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयवंत नाचणकर यांच्या घरात धुरी केली होती, ज्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तात्काळ त्यांना बसणी येथील डॉ. राणी मयेकर यांच्या दवाखान्यात नेण्यात आले. डॉ. मयेकर यांनी तपासणी करून नाचणकर यांना पुढील उपचारांसाठी रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धुरी करताना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 23-06-2025














