मानसिक आरोग्याच्या समस्येने ग्रासलेल्या तरुणाची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

रत्नागिरी : रत्नागिरीत मानसिक संतुलन बिघडलेल्या एका २८ वर्षीय तरुणाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भानू प्रताप रामनिवास चौहान (वय २८, रा. बरसोला किला, जि. लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश) असे या तरुणाचे नाव असून, २१ जून रोजी दुपारी १.३० वाजता रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याप्रकरणी २१ जून रोजी सायंकाळी ५.१३ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद (आमृ. क्रमांक ४९/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे) करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भानू प्रताप चौहान याचे मानसिक संतुलन बिघडले होते. याच कारणामुळे त्याने रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील सुधीर देसाई यांच्या आंब्याच्या बागेत कोणतेतरी गवत मारण्याचे औषध (कीटकनाशक) प्राशन केले. त्याला तातडीने रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे मानसिक आरोग्याच्या समस्येवर वेळीच लक्ष देण्याची आणि योग्य उपचार घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 23-06-2025