मंडणगडमध्ये मोकाट गुरांनी केले लाखो रुपयांचे नुकसान : रोपवाटिकेतून ४ लाखांहून अधिक किमतीची रोपे फस्त!

मंडणगड : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील वाकवली येथे कोकण वैभव निसर्ग कंपनीच्या रोपवाटिकेत मोकाट गुरांनी शिरून सुमारे ४ लाख ३४ हजार ८०० रुपये किमतीची रक्तचंदनाची रोपे खाल्ल्याने मोठे नुकसान झाले आहे. १२ मे २०२५ रोजी दुपारी १२ ते २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, २२ जून रोजी रात्री ७.१९ वाजता मंडणगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंडणगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकण वैभव निसर्ग कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक अनिल जार्दन सावंत (वय ५१, रा. शेनाळे, ता. मंडणगड) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. वाकवली येथील कंपनीच्या जमीन मिळकतीमध्ये असलेल्या रोपवाटिकेत मोहगणी, रक्तचंदन आणि आगरवुड जातीच्या रोपांची लागवड करण्यात आली होती.

आरोपी राजू ढेबे (रा. धनगरवाडी, चिभावे, ता. महाड, जि. रायगड) यांच्या मालकीच्या ६ ते ७ मोकाट गुरांनी नर्सरीत प्रवेश केला. या गुरांनी रक्तचंदन जातीची सुमारे ४३४८ रोपे खाऊन फस्त केली, ज्यामुळे अंदाजे ४,३४,८०० रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३२४(५) नुसार (गु.र.नं. २७/२०२५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडणगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 23-06-2025